राज्यात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर, पंतप्रधान , राष्ट्रपतींसह अनेकांची श्रद्धांजली !!

Foto
मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. दरम्यान त्यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसाचा दुखवटा आणि आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

सर्व कुटुंबीय होते दिल्लीत...

अजित पवारांच्या निधनाची बातमी आली तेव्हा सर्व पवार कुटुंब हे दिल्लीमध्ये एकत्र होतं. या अपघाताची बातमी समजल्यावर सर्व पवार कुटुंब बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांसाठी मोठा धक्का बसला असून दादांच्या अकाली एक्झिटने हळहळ व्यक्त होत आहे. अजित दादांसारखा शिस्तप्रिय असणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी वार्‍यासारखी पसरताच संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. लाडक्या नेतृत्वाच्या चिंतेने बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्रावक आणि विदारक दृश्ये पाहायला मिळत आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. एका पोस्टमध्ये राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक जणांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच लक्षात राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना देव हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.

एक दिलदार आणि दमदार मित्र गमावला- देवेंद्र फडणवीस

अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याची वार्ता सगळ्यांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्रातले लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍याची माहिती असलेला, राज्याच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा हे अतिशय संघर्षशील असं नेतृत्त्व होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशाप्रकारचं नेतृत्त्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते अशावेळी त्यांचं जाणं हे मनाला चटका लावणारं आहे. माझ्यासाठी तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेल्याची भावना आहे. त्यांच्या कुटुंबासाठी देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. सकाळपासूनच मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. त्या कुटुंबाशी चर्चा करुन ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रिया ताईंशी आणि पार्थ पवारांशी बोलणं झालं. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर पुढचे सगळे निर्णय त्यांच्या समंतीने घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबतच तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे. जे घडलंय त्यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही.

मोठा भाऊ हरपला... एकनाथ शिंदे भावूक

यावर प्रतिक्रिया देताना, आपला मोठा भाऊ गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक अभ्यास करुन बोलण्याची सवय होती. चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं.

एकदा कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं. अजित दादांनी सकाळी ६ वाजताही लोकांना भेटत असत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला आहे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. आज सकाळी जेव्हा घटना कळली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे,अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.